Chhaava -छावा Movie review
- StoryTrekker
- Feb 24, 2025
- 1 min read

"छावा " हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आणि पराक्रमावर प्रकाश टाकतो. विशेषतः,या चित्रपटामुळे मराठा साम्राज्य पुन्हा चर्चेत आले आहे. आपल्या पाठपुस्तकांत सुद्धा फार संक्षिप्त इतिहास आहे .बहुतांश लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माहिती आहे, पण संभाजी महाराजही तितकेच शूर, बुद्धिमान आणि धोरणी योद्धा होते, हे चित्रपट अधोरेखित करतो, ही बाब नक्कीच प्रशंसनीय आहे आणि मराठा साम्राज्याची झलक पूर्ण भारताला या movie मूळे परिचित होते .
कास्टिंग आणि भाषा:
चित्रपटातील कास्टिंग प्रभावी आहे. विकी कौशलने संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली आहे. त्याचा आवाज, अभिनयातील भावना आणि ॲक्शन जबरदस्त आहे! त्याने युद्धप्रसंग आणि संवादफेक उत्तम प्रकारे
साकारली आहे. मात्र, जर हा रोल एखाद्या मराठी अभिनेत्याने केला असता, तर तो आणखी नैसर्गिक वाटला असता.
चित्रपट मुख्यतः हिंदीमध्ये आहे, जे व्यावसायिक दृष्टिकोनातून समजू शकतो. पण, काही महत्त्वाचे संवाद, विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे विचार मांडणारे संवाद, मराठीत असायला हवे होते. ते मराठी प्रेक्षकांसाठी अधिक प्रभावी ठरले असते.
तरीपण मी इथे माझा मराठीबाणा बाजूला ठेवून अभिमानाने म्हणेल की सर्वमान्य हिंदी भाषेमध्ये मूवी बनवल्यामुळे देशपातळीवर माझ्या राजाचा गौरव अजूनच अभिमानास्पद वाटेल आणि मराठा साम्राज्य पुन्हा एकदा कुठल्या धर्मापुरत ,प्रेदेशापुरत सीमित नाहीच हे स्पष्ट होते .
दिग्दर्शन आणि संगीत:
हा चित्रपट एका मराठी दिग्दर्शकाने दिग्दर्शित केला आहे,आणि त्यामुळे त्याला आवश्यक असलेली
खोलवर जाणारी दृश्यात्मक समज मिळाली आहे. मराठा इतिहास, त्यांच्या लढाया, आणि व्यक्तीरेखा यांचे बारकावे फक्त एखादा मराठी दिग्दर्शकच अचूकपणे समजू शकतो. त्यामुळे चित्रपटाचे दिग्दर्शन अगदी प्रभावी आणि अपेक्षेप्रमाणे उत्कृष्ट झाले आहे.
ए.र.रहमान यांच्या संगीताने चित्रपटाला अजून मोठेपणा दिला आहे. पार्श्वसंगीत आणि गाणी युद्धाच्या
प्रसंगांना अधिक ऊर्जावान बनवतात. चित्रपटाच्या भावनात्मक क्षणांना संगीतामुळे अधिक खोली मिळते, आणि हे चित्रपटाच्या प्रभावीपणाला मोठी भर घालते.
कलाकारांचा अभिनय:
विकी कौशलने जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे! त्याचा आवाज आणि संवादफेक प्रभावी असून, त्याचा अभिनय दमदार आहे.
सोयराबाईंच्या भूमिकेत दिव्या दत्ताने अप्रतिम अभिनय केला आहे! दिव्या दत्ताने सोयराबाईंच्या
महत्त्वाकांक्षा, अंतर्गत राजकारण,आणि संभाजी महाराजांविषयी असलेला विरोध चांगल्या पद्धतीने दाखवला आहे.
चित्रपटांमध्ये येसूबाई आणि संभाजी महाराज यांच्यातील दृश्य जास्त आहेत त्याऐवजी सोयराबाई नकळत खलनायिका कश्या बनल्यात याचा संक्षिप्त इतिहास दाखवायला हवा होता .
औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्नाने अप्रतिम अभिनय केला आहे! पूर्वमाहिती शिवाय औरंजेब हा अक्षय खन्ना आहे हे ओळखताच येत नाही.त्याने औरंगजेबाच्या क्रूर, धोरणी आणि बुद्धिमान स्वभावाचे अचूक दर्शन घडवले आहे. त्याची संवादफेक आणि देहबोली प्रभावी असून, त्याने आपल्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे.
कथानक आणि ऐतिहासिक संदर्भ:
चित्रपटाची सुरुवात थेट मराठ्यांनी बुऱ्हाणपूरवर हल्ला करण्यापासून होते, परंतु हा हल्ला का झाला आणि त्यामागची पार्श्वभूमी काय होती, हे चित्रपट पुरेशा स्पष्टतेने दाखवत नाही.
औरंगजेब हा केवळ एक क्रूर बादशहा नव्हता, तर एक अत्यंत शक्तिशाली सम्राट होता. त्याची सैन्यशक्ती, संपत्ती आणि रणनीती सर्वच बाबतीत तो मजबूत होता. त्यामुळे मराठ्यांनी त्याच्या साम्राज्यात थेट प्रवेश करून बुऱ्हाणपूरवर हल्ला का केला, याला पुरेशा ऐतिहासिक कारणांची जोड दिली असती, तर चित्रपट अधिक विश्वासार्ह वाटला असता.
रायगडहून इतक्या लांब असलेल्या बुऱ्हाणपूरवर अचानक हल्ला करणे ही एक मोठी गोष्ट होती. संभाजी महाराजांना नेमकी कोणती परिस्थिती या निर्णायक निर्णयाकडे घेऊन गेली, हे दाखवले असते तर चित्रपट अधिक परिणामकारक वाटला असता.
इतिहासाची गरज आणि महत्त्व:
या चित्रपटामुळे मराठा साम्राज्याची महती संपूर्ण भारतभर पोहोचली, ही बाब मला सर्वांत जास्त आवडली. महाराष्ट्रात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे कार्य अनेकांना माहिती आहे, पण भारताच्या इतर भागांत त्यांच्या कार्याबद्दल फारशी स्पष्टता नाही. काही ठिकाणी तर त्यांच्या कार्याविषयी चुकीची माहिती पसरलेली आहे.
अशा प्रकारचे चित्रपट सातत्याने येणे गरजेचे आहे, जेणेकरून संपूर्ण देशाला कळेल की महाराष्ट्रात शिवाजी आणि संभाजी महाराज का पूजले जातात, त्यांचे योगदान किती मोठे आहे, आणि त्यांनी केवळ मराठ्यांसाठीच नव्हे, तर अखंड भारतासाठी किती मोठे कार्य केले आहे.
माझी इच्छा आहे की मराठा साम्राज्यावर आणखी असे ऐतिहासिक चित्रपट बनावेत, जेणेकरून शिवाजी महाराज, संभाजी महाराज, आणि इतर मराठा योद्ध्यांचे शौर्य संपूर्ण देशभर पोहोचेल.
एकूण अनुभव:
अप्रतिम ,शेवटच्या क्षणाला संपूर्ण house स्तब्ध झाले यातच सगळं काही सामावलेलं आहे.
प्रत्येकाने नक्की पहावा असा .त्यानिमित्ताने आपण पुन्हा इतिहासाला जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि कदाचित यामुळे जो चुकीचा इतिहास पसरवला जातो त्यावर पडदा पडेल .
रेटिंग: ⭐⭐⭐⭐ (4.5/5) - उत्कृष्ट अभिनय, दिग्दर्शन आणि संगीत, पण काही ऐतिहासिक संदर्भ अधिक स्पष्ट करायला हवे होते!






Comments